मिरजोळेतील भक्ती मयेकर या तरूणीच्या खुनाच्या तपासादरम्यान संशयित आरोपी दुर्वास पाटील याने केलेले आणखी दोन खून उघडकीस आले असून एकाच आरोपीने ३ खून केल्याची रत्नागिरीतील बहुधा ही पहिलीच वेळ असावी, असे बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच अवघ्या जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान आता जयगड पोलीसांनी मुख्य आरोपी दुर्वास पाटीलच्या बारमधील वेटरच्या खूनप्रकरणी दुर्वास पाटीलला सहकार्य करणाऱ्या निलेश रमेश भिंगार्डे (वय ३५, रा. इस्लामपूर, सांगली) याला अटक केली आहे. त्याची रवानगी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
केबलने गळा आवळला – विवाहासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसी भक्ती मयेकरचा केबलने गळा आवळून खून करत तिला आंबा घाटातील दरीत फेकून देण्याच्या आरोपाखाली खंडाळ्यातील देशी बार मालक दुर्वास पाटील याच्यासह बारचा मॅनेजर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांना संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली. या तिघांच्या चौकशीत या आरोपींनी दुर्वास पाटीलच्या मालकीच्या बारमधील वेटरचाही अशाच पद्धतीने खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यामध्ये दुर्वास आणि सुशांतसह सांगलीच्या इस्लामपूरमधील एका आरोपीचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. रत्नागिरी शहर पोलिसांनी ही माहिती जयगड पोलिसांकडे कळवल्यानंतर जयगड पोलिसांनी तातडीने सांगलीतील नीलेश भिंगार्डे या आरोपीला अटक केली.
वर्षभरापूर्वीचा प्रकार – या आरोपीला हजर करण्यात सोमवारी न्यायालयासमोर आले. न्यायालयाने या आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वर्षभरापूर्वी संशयित आरोपी दुर्वास पाटील याच्या बारमधील वेटर राकेश जंगम (२८, रा. वाटद खंडाळा) हा ६ जून २०२४ च्या रात्री खंडाळा येथे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. या वेटरला संशयित आरोपी दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे यांनी कोल्हापूर येथून जावून येऊ या, असे सांगून कारमध्ये बसवले. या प्रवासादरम्यान या तिन्ही आरोपींनी त्या वेटरचा गळा आवळून त्याला ठार मारले आणि आंबा घाटातील दरीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे जयगड पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. दरम्यान संशयित आरोपी दुर्वास पाटीलने आणखी दुसरा एक खून केल्याची कुणकुण असून या दिशेनेही तपास सुरु आहे. प्रेयसीच्या खुनप्रकरणी या आरोपींना रविवारी न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी सुनावली असून वेटरच्या खूनप्रकरणी तिसऱ्याही आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृतदेहाचा शोध सुरू – जंगमच्या दरम्यान राकेश खुनाच्या आरोपाखाली तिघांना अटक झाली असली तरी अजून मृतदेह सापडलेला नाही. त्याचा शोध सुरूच आहे. त्याचबरोबर भक्ती. मयेकर, राकेश जंगम याच्यासह आणखी एक खून केल्याचे चौकशीत मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने कबूल केले असले तरी त्याबाबतची तपशीलवार माहिती अजूनही हाती लागलेली नाही. तपास सुरू आहे असे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.