गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी तमाम चाकरमान्यांनी भल्या पहाटेपासून रांग लावली होती. मात्र बुकींग सुरू होताच अवघ्या ६३ सेकंदात गाड्या फुल्ल झाल्याचा मेसेज मिळताच चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे. गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीने जेमतेम काही मिनिटांत गाड्या बुक झाल्याचा मेसेज आला होता. हा तिकिटांचा काळाबाजार असल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. यावेळीही हाच अनुभव पुन्हा आल्याने चाकरम ान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात.
अवघ्या ६३ सेंकदात प्रतीक्षा यादी ५०० पार गेली आहे सर्व गाड्या एका मिनिटांत आरक्षित झाल्या. यामुळे प्रवाशांनी तिकीट आरक्षण प्रक्रियेत गैरप्रकाराचा आरोप केला आहे. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या ३ दिवस आधी म्हणजे ४ सप्टेंबर रोजीचे आरक्षण ७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालं. यानंतर केवळ ६३ सेकंदांनी कोकणकन्या एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट ५८० च्या पार गेली. कोकणात जाणाऱ्या अन्य ट्रेन्सचं बुकिंगही फुल्ल झालं आहे. गणेशोत्वाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची वेटिंग लिस्ट ५०० च्या पार गेली आहे.
यंदा गणेशोत्सवाला ७ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने आधीच्या १२० दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या ६३ सेकंदात ५०० पार गेली होती. गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी ३ महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या समस्येला सामोरे जावे लागते.
गणेशोत्सवात चढ्या दराने तिकिट विक्री करण्याचे रॅकेट – कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे २ सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्ट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो. रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु असल्याचा आरोप होतो आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवातील रेल्वे तिकिटांचा काळाबाजार समोर आला होता.