मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी रंगीत तालीम असलेल्या तरीही तेवढ्याच प्रतिष्ठेच्या आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली. दुखापतीमुळे गेले अनेक महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या जसप्रीत बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यासह केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी पुनरागमन केले आहे. तिलक वर्माला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी आयर्लंड दौऱ्यात तंदुरुस्तीसह मॅच फिटनेस आणि फॉर्म हे सर्व सिद्ध लिए केल्यामुळे त्याची निवड निश्चित होती; परंतु राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबत प्रश्नचिन्ह होते.
ते आज दूर झाले. अय्यर तर पूर्णपणे तंदुरुस्त आहे, राहुलला मामुली दुखापत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी बॅकअप यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली. निवड समितीचे नवीन अध्यक्ष अजित आगरकर यांच्या समितीने निवडलेले खेळाडू अपेक्षित होते, प्रश्न केवळ राहुल, अय्यर यांच्या तंदुरुस्तीबाबत होता; परंतु बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा यांची आंतरराष्ट्रीय सामना खेळाडू चाचणी झाली तशी राहुल आणि अय्यर यांची झाली नाही. त्यामुळे ते थेट आशिया करंडक स्पर्धेतच खेळतील, असे चित्र आहे.
बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ५०-५० षटकांचे दोन सराव सामने अय्यर खेळला आहे. त्यामुळे त्याची तंदुरुस्ती आम्ही पाहिली आहे. राहुलबाबतही तेच आहे. ज्या दुखापतीमुळे तो गेली अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता त्यातून तो पूर्ण बरा झाला आहे, मात्र आता सरावात याला दुसरी छोटीशी दुखापत झाली नाहे, त्यातून तो बरा होईल, म्हणून आम्ही त्याची निवड केली, असे आगरकर यांनी सांगितले.
अजून नऊ सामने आहेत – विश्वकरंडक स्पर्धेत उतरण्यापूर्वी अजून नऊ एकदिवसीय आणि दोन सराव सामने आम्ही खेळणार आहोत, त्यामुळे तसा बराच वेळ आहे. यातून आम्ही फलंदाजीचे क्रमांक निश्चित करू शकतो, असे रोहित म्हणाला. तिलक वर्माची निवड करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित आगरकर म्हणाले, तिलकने वेस्ट इंडीजमध्ये आपली गुणवत्ता सादर केली. त्याने तेथे केलेल्या धावांमुळेच त्याची निवड करण्यात आली नाही तर त्याने दाखवलेला आत्मविश्वास तसेच तो डावखुरा असल्यामुळे आम्ही त्याला प्राधान्य दिले.
संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राहुलसाठी बॅकअप)