22.7 C
Ratnagiri
Wednesday, December 3, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeDapoliकेळशी शाळेत राज्यातील पहिली 'टिंकर लॅब'

केळशी शाळेत राज्यातील पहिली ‘टिंकर लॅब’

पहिली ते सातवीचे विद्यार्थी एआय आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेणार आहेत.

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा केळशी नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांना एआय आणि रोबोटिक्सचे धडे गिरवता येणार आहेत. ही शाळा रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील एआय टिंकर लॅब सुरू होणारी पहिली जिल्हा परिषदेची मराठी शाळा ठरणार आहे. याचे उद्घाटन गुरुवारी (ता. २४) सकाळी १० वाजता होईल. पुणे येथील स्काय रोबोटिक्सच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील १५ माध्यमिक शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे दिले जात आहेत. या शाळांमध्ये एआय टिंकर लॅब सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन माध्यमिक शाळांनी यामध्ये सहभाग घेतला असून, आता कोकणात नव्हे तर महाराष्ट्रात प्रथमच दापोली तालुक्यातील केळशी येथील प्राथमिक केंद्रशाळा नं. १ या ठिकाणी एआय टिंकर लॅब विद्यार्थ्यांसाठी खुली होत आहे.

या माध्यमातून पहिली ते सातवीचे विद्यार्थी एआय आणि रोबोटिक्सचे शिक्षण घेणार आहेत. गतवर्षीपासून रत्नागिरी जिल्ह्यात स्काय रोबोटिक्सने हा उपक्रम सुरू केला आहे. पालक शाळा आणि संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी या नव्या उपक्रमाची सुरुवात झाली. दापोली येथील दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थीदेखील एआयचे धडे गिरवू लागले आहेत. त्यातून प्रेरणा घेत केळशी नं. १ शाळेचे मुख्याध्यापक संदीप तळदेवकर व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रथमच एआय आणि रोबोटिक्स शिकवले जाणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमाचे गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. सांगडे, आंजर्ले प्रभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी एन. एच. वलेले, केळशीच्या सरपंच श्रेया मांदविलकर, स्काई रोबोटिक्सचे संचालक अभिजित सहस्रबुद्धे व कृष्णमूर्ती बुक्का तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज आंबेकर, उपाध्यक्ष प्रथमेश सुपेकर आदींच्या उपस्थितीत होणार आहे.

११५ विद्यार्थ्यांना धडे गिरवणे शक्य – केळशी शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत ११५ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी अद्ययावत १० संगणकांची लॅब तयार झाली आहे. या ठिकाणी तज्ज्ञ असलेल्या गायत्री परांजपे या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular