गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी विलनिकरणाच्या मागणीसाठी संपावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे, या मागणीवर कर्मचारी अद्याप ठाम असून त्यांचा बेमुदत संप सुरुच आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आज २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलक आक्रमक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सक्रीय झाली आहे.
अद्याप संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, विलिनीकरणाबााबत समितीच्या अहवालात नेमक्या काय शिफारशी आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का? कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे. संपाचा तिढा कायम असताना आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडे कामगारांबरोबरच अख्ख्या राज्यातील जनतेचे देखील लक्ष लागून राहिले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत संपामुळे सुमारे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल कायम आहेत़. त्यातील काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, तर काही अद्यापही आपल्या मागण्या आणि संपावर ठामच आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एसटी संपावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला जेवढी मदत शक्य होती तेवढी मदत केली. आता कामावर परत या असे अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.