रविवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पुण्याहून आलेले काही पर्यटक फिरण्यासाठी गेले होते. पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश पांडुरंग सुतार, राजकुमार शेषराव पिटले, कृष्णा ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार याला समुद्रात पोहण्यास जाण्याचा मोह आवरला नाही. त्यावेळी त्याच्या बरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने आणि जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले.
यावेळी मित्र राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतऋण त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. धावपळ केली पण आकाश कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे मित्रांनी तातडीने धाव घेत जवळच असलेल्या एका दुकानदाराला या घटनेबाबत माहिती दिली व त्यांच्या मदतीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
कोकण आणि समुद्राचे वेगळेच नाते आहे. आणि समुद्राचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून कोकणात येतात. परंतू, समुद्रात पोहोण्याचा अताताईपणा असा पर्यटकांच्या अंगाशी येत आहे. समुद्रामध्ये मज्जा मस्ती करताना आवश्यक ती काळजी घेणे आणि स्थानिकांच्या सूचनाकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने अनेक वेळा दुर्घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. सणासुदीच्या काळामध्ये बऱ्याच वेळा अशा घटना कोकणात दुर्दैवाने दरवर्षी घडून येत आहेत.
रत्नागिरी गावखडी समुद्रात रविवारी हा असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने पुण्यातील एक २८ वर्षीय तरूण पर्यटक बुडाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली पण रात्री उशिरापर्यंत बेपत आकाश कोठेही सापडलेला नाही. तर सध्या त्याचा शोध सुरू असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

