भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रत्नागिरीत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत शासकीय रूग्णालय ते जयस्तंभकडे जाणारी वाहतूक गोगटे कॉलेजमार्गे वळविण्यात आली आहे.देशभरात शुक्रवारी भारतरत्न डॉ. आंबेडकरांची जयंती उत्साही वातावरणात साजरी होत आहे. रत्नागिरीत जयस्तंभ परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो भीमसैनिक येतात. यावेळी मोठी गर्दी होत असल्याने १४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.ही वाहतूक शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गाने एस.टी. स्टँड रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक जेल रोड, गोगटे कॉलेज, स्टेट बँकमार्गे जयस्तंभ व तेथून एस.टी. स्टँड या पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केले आहेत.
डॉ. आंबेडकर पुतळा, शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे कार्यक्रम होणार आहेत. तेथील रस्त्यावरील वाहतूक दोन्ही बाजूने सुरु ठेवल्यास अपघात घडून त्याव्दारे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यासाठी १४ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत या कालावधीत शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गाने एस.टी. स्टॅण्ड रत्नागिरीकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात येत आहे.वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी, यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्ह उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असे आदेशात नमूद केले आहे.