आंबा, काजू बागांसह फळपिकांचे नुकसान करणाऱ्या वानर व माकडे यांना पकडण्याची मोहीम आंबा हंगामाच्या पूर्वी सुरू करण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. या मोहिमेसाठी ३५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे वन विभागाकडून पाठविण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील फळबागा आणि शेतीपिकांचे वानर व माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आंबा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे आणि बागायतदारांनी माकड, वानरांपासून होणाऱ्या उपद्रवाबद्दल आवाज उठविला होता. त्यासाठी आंदोलनही केले होते.
माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला समोर जावे लागत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत, सिंधू-रत्न योजनेचे सदस्य किरण सामंत यांच्यापुढे मांडला होता. त्यांनी वानर पकडण्याच्या मोहिमेसाठी निधी देऊ अशा सूचना दिल्या. त्यानुसार त्यावर उपाययोजना म्हणून वानर पकडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. प्रशासनाकडून निधी मिळाल्यानंतर माकड पकडण्यासाठी दोन पिंजरेही घेण्यात आले. मे महिन्यात गोळप येथे माकड पकडण्याचे प्रात्यक्षिकही केले गेले. त्यामध्ये सुमारे काही माकडे पकडली गेली.
त्यांना अभयारण्यात सोडण्यात आले. त्यानंतर वानर पकडण्याच्या मोहिमेसाठी निधीची गरज होती. वन विभागाच्या विभागिय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या सूचनेनुसार ३५ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आठ दिवसांत माकड पकडण्याची मोहीम हाती घेण्यात येईल, असे रत्नागिरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
निर्बीजीकरणाचा प्रस्ताव – वानर आणि माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीसंदर्भात मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. शासनाच्या निर्देशानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये माकड, वानर यांची प्रगणना करण्यात आली. त्यानंतर शासनाने माकडांच्या निर्बीजीकरणाचा उपाय सुचविला आहे. माकडांची, वानरांची धरपकड करून निर्बीजीकरण मोहीम राबविण्याचा प्रस्ताव कोल्हापूर विभागाकडून सादर करण्यात आला.