चिपळूणवर आपल्याच गटाचे वर्चस्व राहावे यासाठी दोन्ही पवारांनी बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. अजित पवारांच्या दौऱ्यानंतर लगेचच शरद पवार चिपळूणच्या दौऱ्यावर आले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चिपळूणची निवडणूक चुरशीची होणार, याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. चिपळूण नेमक्या कोणत्या पवारांकडे राहील, याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे; परंतु निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीत स्पर्धा रंगल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे; मात्र अजित पवार गट आणि शरद पवार गटात ती दुभंगली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांना चिपळूणची राजकीय नस, सहकाराच्या जाळ्याची आणि त्यातून पुढे आलेल्या नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची पुरेशी माहिती आहे. त्यातूनच आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबुतीसाठी दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झालेली बंडखोरी मतदारांना किती आवडली, हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे. त्याची चाचपणी करण्यासाठी पवारांनी चिपळूणचा दौरा केल्याची चर्चा आता रंगत आहे. त्यांच्या दौऱ्याला अपेक्षित यश मिळाल्यामुळे शरद पवार आता पुढची कोणती चाल खेळणार, याकडे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून आहे.
सत्तेशिवाय काम होत नाही, असे विचार खासदार सुनील तटकरे यांनी मांडले. त्याला उत्तर देताना सत्ता येत-जात राहते, विचार महत्त्वाचे असतात. त्याच्याशी गद्दारी करता येत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. विद्यमान आमदार शेखर निकम अजित पवार गटाचे आहेत. ते सहकार आणि शिक्षणक्षेत्रातील आहेत. शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले प्रशांत यादव यांना देखील सहकाराची पार्श्वभूमी आहे. अर्थमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाजासाठी कोणकोणत्या योजना सुरू केल्या आणि चिपळूणसाठी किती निधी दिला, याची माहिती अजित पवारांनी दिली. अजित पवार यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार कुंभार्ली घाटमार्गे चिपळूणमध्ये दाखल झाले.
येताना त्यांनी रस्त्याची दूरवस्था पाहिली आणि रस्त्यांविषयी नाराजी व्यक्त केली. इतके खराब रस्ते महाराष्ट्रात कुठेच पाहिले नाहीत, असे सांगून त्यांनी शेखर निकम यांनी केलेल्या विकासावर टीका केली. माजी आमदार रमेश कदम यांनी चिपळूणमध्ये ठेकेदारांचा विकास झाल्याचा आरोप केला. शरद पवारांच्या सभेला गर्दी होईल, हे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते; मात्र शेखर निकम या तगड्या उमेदवारासमोर निवडणूक लढविताना शरद पवार गटाला ही गर्दी जमविणे गरजेचे होते. शेखर निकम यांच्या आव्हानाला प्रशांत यादव यांनी सभेतून प्रतिआव्हान दिले.