शहरातील मुख्य बाजारपेठेतील खराब झालेल्या रस्त्यांचे स्मार्ट सिटीअंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच सुरू झाले. ऐन दिवाळीच्या हंगामात रस्त्यांचे काम सुरू झाले, तर व्यापारावर परिणाम होण्याच्या शक्यतेने रामआळी, मारुती आळी आदी ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी या कामाला विरोध केला. रस्त्याला विरोध नाही; परंतु दिवाळीनंतर हे काम करावे, अशी मागणी करणारे निवेदन आज मुख्याधिकाऱ्यांना दिले. तसेच याबाबत तातडीने बैठक घेऊन त्यांची बाजू ऐकून घ्यावी, कामातील तांत्रिक बाबी समोर ठेवल्या जाव्यात, त्यानुसार काम केले जावे, अशा सूचना त्यांनी केल्या. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या रामआळी, मारुती आळी तसा अन्य भागांतील व्यापारीवर्ग, तसेच येथील रहिवासी यांनी या संदर्भात आज पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेत निवेदन दिले. लवकरच दिवाळी तसेच एकादशीचा मोठा बाजार भरतो. या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.
जर याच वेळी रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाले, तर दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल. त्यामुळे हे काम दिवाळी आणि एकादशी होईपर्यंत पुढे ढकलावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता नवीन काँक्रिटीकरण होईपर्यंत सध्या खराब झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी जेणेकरून रहिवासी व व्यापाऱ्यांची गैरसोय टळेल. काँक्रिटीकरण करताना रस्त्याची रुंदी-उंची, ड्रेनेज लाईन आणि इतर तांत्रिक बाबींबाबत स्थानिक रहिवासी व व्यापारी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम आराखडा तयार करावा. या संदर्भात, त्यांनी रस्त्याचे स्वरूप कसे असावे, यासंबंधी माहितीपत्रक व नागरिकांच्या सह्यांचे पत्रकदेखील निवेदनासोबत जोडले आहे. काँक्रिटच्या रस्त्याची उंची वाढणार असल्याने आणि गटार सुस्थितीत नसल्याने दुकाने आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.
रहिवासी व व्यापाऱ्यांच्या सूचनांचा विचार न करता किंवा सणांच्या काळात काम सुरू केल्यास या कामाला आपला कायम विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडली. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसोबत तातडीने एक बैठक आयोजित करण्याची विनंती मुख्याधिकाऱ्यांकडे केली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी आणि मारुती आळीतील प्रतिनिधी, रहिवासी उपस्थित राहिल्यास समस्येवर त्वरित मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवसेना पदाधिकारी-व्यापाऱ्यांमध्ये वाद – शहरातील खराब रस्त्यांबाबत नागरिकांची ओरड असल्याने पावसाची उघडीप पाहून तत्काळ अंतर्गत रस्तेदेखील काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले. पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी सुमारे १० कोटी मंजूर केले आहेत. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार, काल काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली; परंतु काही व्यापाऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे शिवसेना शहर पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये रात्री जोरदार वाद झाला. मात्र, अन्य व्यापाऱ्यांनी त्यामध्ये मध्यस्थी केली.