मागील अडीच महिन्यापासून एलईडी लाईटच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीच्या विरोधातील आंदोलनाची शासन दरबारी दखल न घेतल्याने अखेर रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना एलईडी लाईटच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीला तात्काळ बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने पारित केलेल्या नवीन मासेमारी कायद्यामुळे पर्ससीन मासेमारी हि १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे. तसे आदेश जिल्ह्यातील मत्स्य आयुक्तांना दिलेले असून सुदा रत्नागिरी मिरकरवाडा मासेमारी बंदरातून राजरोसपणे पर्ससीन मासेमारी केली जात आहे. याबाबत आम्ही सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय , रत्नागिरी यांचे निदर्शनास या गोष्टी आणून दिलेल्या आहेत. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे आम्ही पुराव्यासह राज्य शासनाचे कायदे धाब्यावर बसवून मासेमारी सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी व तात्काळ पर्ससीनच्या सहाय्याने होणारी तसेच एलईडी लाईटच्या सहाय्याने होणारी मासेमारी बंद करून नौकांवरती त्वरित शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
आपल्या कार्यालयात आमच्या विविध संघटनांनी लेखी निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेली आहेत. तरी देखील सध्या राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने एलईडी लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात नौका पर्ससीन मासेमारी करीत आहेत असे म्हटले आहे. आज पारंपरिक मच्छिमारांची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनलेली असून त्यांच्या नौका जिल्ह्यातल्या बंदरात फक्त उभ्या आहेत, गुजराण कसे करायचे याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.