गणेशोत्सव संभाव्य काळात होणाऱ्या वाहतूककोंडीची झलक चाकरमान्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनुभवली. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती. त्यामुळे ठिकठिकाणी कोंडी झाली. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या रेल्वे, एसटी फुल्ल आहेत तर खासगी गाड्यांचे तिकीट सर्वसामान्य कोकणवासीयांना परवडत नाही. तरीही ‘कोकण म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे कोकण’ ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येतोच. नारळी पौर्णिमेनंतर ही तयारी वेगाने सुरू होते.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुटी, १६ ऑगस्टला दहीहंडी आणि १७ ऑगस्टला रविवार असल्यामुळे सलग तीन सुट्या जोडून आल्या. त्यामुळे चाकरमान्यांसह अनेक पर्यटक या सुटीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले होते. खेड, चिपळूण संगमेश्वर या भागातील महामार्गावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग खराब असल्याने अपघाताची भीती चाकरमान्यांना असून, कोंडी तर आमच्या पाचवीलाच पुजली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.