दिवाळीच्या निमित्ताने रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी चिपळूण शहर आणि उपनगर उजळले. नागरिकांमध्ये दीपोत्सवातील उत्साह ओसंडून वाहत होता. पारंपरिक उत्साहात सर्वत्र नरक चतुर्दशी साजरी झाली. दिवाळीचा उत्साह सर्वत्र वाहत असताना शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सायंकाळनंतर सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडणारे अनेक नागरिक बाजाराकडे फिरकलेच नाही. त्यांनी ऑनलाईन खरेदी केल्यामुळे प्रत्यक्ष बाजारात म्हणावी तशी उलाढाल झाली नाही. मंगलमय दिवाळीनिमित्त चिपळूणची बाजारपेठ सजली होती. दिव्यांनी घरे, अंगण, शहर उजळले होते. दागिने, दुचाकी-चारचाकी वाहने, कपडे, भेटवस्तू, मिठाई, सुकामेवा आदींच्या विक्रीसाठी बाजारपेठ सज्ज झाली होती. व्यापारी, व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अक्षरशः विविध सवलत योजनांची आतषबाजी केली होती.
लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी विविध स्वरूपांतील वस्तू खरेदीचे नागरिकांनी नियोजन केले होते. दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश जणांच्या हातात पगार आणि बोनस मिळाला. त्यानंतर पहिल्यांदा घरातील फराळसाठीचे साहित्य खरेदी आणि त्यानंतर आता कपडे, दागिने, वाहन, फटाके, गृहोपयोगी वस्तू, स्मार्टफोन, लॅपटॉप आदींची खरेदी; तर फ्लॅटच्या बुकिंगचे नियोजन केले होते. लक्ष्मीपूजन, पाडव्याच्या खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडतात. अशात रस्त्यांवर वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याने कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी कोणत्याही स्तरावर प्रयत्न झाले नाहीत. मुख्य रस्त्यांवर गर्दीतून वाहन काढताना नागरिकांना घाम फुटत होता. त्यामुळे अनेक नागरिकांनी शक्य त्या वस्तूंची ऑनलाईन खरेदी केली.
कुठे झाली वाहतूक कोंडी – शहरातील चिंचनाक्यापासून अजिंक्य आर्केड, शिवनदी पूल, पालिका परिसर, जुने बसस्थानक परिसर, पद्माचित्र मंदिर परिसर, गांधीचौक, नाथ पै चौक, क्वालिटी बेकरी परिसर, गुहागर नाका, खाटीक आळी, भाजीमंडई या परिसरात सततची वाहतूक कोंडी सुरू होत होती. यातून वाहनचालकांमध्ये किरकोळ वादाचे प्रकारही घडले.