मतदारसंघाला विकासाच्या स्पर्धेत टॉप फाईव्हमध्ये नेण्याबरोबरच नारायण राणेंच्या २०१४ ला झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे माजी खासदार नीलेश राणे यांनी जाहीर केल्याने राणे कुटुंबासाठी कुडाळची विधानसभेची लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. त्यांना ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचे तगडे आव्हान असल्याने महायुतीला निवडणुकीमध्ये कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी पाहता गेली कित्येक वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. मात्र त्या आधी येथे राणेंचा एकहाती प्रभाव होता. २०१४ ला शिवसेनेच्या नाईक यांनी पराभव दाखवल्याने राणेंचा हा गड शिवसेनेकडे गेला. या पराभवाची सल राणेंनी अनेक सभांमधून बोलून दाखवली. आता पुन्हा एकदा कुडाळवरील वर्चस्वासाठी शिवसेना आणि राणे यांच्यामधील चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीकडून माजी खासदार नीलेश राणे येथून लढायला इच्छुक होते. मात्र ही जागा शिंदे शिवसेनेच्या वाट्याला आली.
यामुळे राणे यांनी २३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो जनसमुदायाच्या साक्षीने शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी कोणाशी स्पर्धा म्हणून नाही तर वडिलांच्या २०१४ मध्ये झालेला पराभवाचा वचपा काढण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याची भूमिका घेतली आहे. दहा वर्षांच्या कालावधीत अनेक पदे मिळाली होती; मात्र सर्व पदे दूर ठेवून याच मतदारसंघातून शिवसेना महायुतीचा उमेदवार विधानसभेवर गेला पाहिजे, म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मतदारसंघाला टॉप फाईव्हमध्ये नेणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. असे असले तरी हे आव्हान सोपे नाही. ठाकरे शिवसेनेची ‘मशाल’ हाती घेऊन श्री. नाईक या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. यामुळे तोडीस तोड लढत होत आहे.
राणे ३५ वर्षांपासून राजकारणात – राणे कुटुंबाचे जिल्ह्यातील राजकारण सुमारे ३५ वर्षे जुने आहे. राणे या मतदारसंघातील मालवण तालुक्याशी ११९० पासून थेट जोडले गेले आहेत. त्यामुळे ही लढत राणे कुटुंबासाठी चुरशीची आहे. येथे दोनवेळा श्री. नाईक जिंकले असले तरी गेल्या लोकसभेला भाजपने बाजी मारली आहे. येथे राणेंना मानणार मतदार आणि स्थानिक पातळीवरील नेते आहेत. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे केलेला पक्षप्रवेश पाहता ही निवडणूक दुरंगी आणि ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.
नाईकांकडून विविध विकासकामे – गेली दहा वर्षे आमदार नाईक यांनीही या मतदारसंघात कोट्यवधीचा विकास निधी आणून विविध विकासकामे केली आहेत. त्यांना मानणारे नेटवर्क त्यांनी उभे केले आहेत. शिवाय शिवसेनेला असणाऱ्या सहानुभुतीचाही उपयोग त्यांना होणार आहे. एकूणच ही लढाई अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. मतदारसंघाची वस्तुस्थिती पाहता, मतदार कोणत्या बाजूने कौल देतो, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.