येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील झाडे तोडून काही वर्षांपूर्वी दापोली शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणामुळे वाहतुकीचा वेग वाढण्याऐवजी पूर्णपणे मंदावला आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी उभ्या करून ठेवलेल्या असतात तसेच फळभाजी, थंड पेय व वडापाव नाश्त्याच्या टपऱ्याही उभ्या केल्या आहेत. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होते. याकडे वेळीच लक्ष देऊन रस्ता मोकळा करणे आवश्यक झाले आहे. दापोली पर्यटनासाठी नावाजलेले ठिकाण आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येणारा पर्यटक शहरातील वातावरणाचा आनंद घेण्यासाठी थांबत असतो. अशाप्रकारे दुतर्फा वाहने उभी करून ठेवल्यामुळे पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांची नेहमीच वर्दळ होते. त्यासाठी सर्वांकडेच वाहनांची व्यवस्था नसते.
त्यामुळे ग्रामीण भागातून येणारी बरीचशी लोकं एसटीचा उपयोग करतात. अशावेळेस दुतर्फा वाहनांची गर्दी, टपऱ्यांची गर्दी, थंडपेय आइस्क्रीमच्या गाड्यांची गर्दी, फळभाज्यांचे स्टॉल असल्याने त्या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोच तसेच पादचाऱ्यांनाही या गर्दीतून चालण्याची कसरत करावी लागते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांसह अनधिकृत टपऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासन व नगरपंचायतीने याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. दापोली बसस्थानक ते बुरोंडी नाक्यापर्यंत रस्ता मोकळा करणे आवश्यक आहे. हा रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड करण्यात आली आहे.
निर्बंध येणे आवश्यक – बसस्थानक ते बुरोंडी नाक्यापर्यंत उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय, तहसील कार्यालय, पेट्रोल पंप, नगरपंचायत, दोन शाळा, रुग्णालय, शासकीय व निमशासकीय कार्यालये असल्यामुळे खूपच गर्दी होत असते. त्यामुळे अनेकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते. सध्या शिमगोत्सव व रमजान महिना सुरू आहे. शहरात ग्रामीण भागातील नागरिकांची खूपच वर्दळ सुरू आहे. त्यामुळे या प्रकारांवर निर्बंध येणे आवश्यक आहेत.