25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriचाकरमानी १६ तासांनी घरात, महामार्गावर वाहतूक कोंडी

चाकरमानी १६ तासांनी घरात, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहने वळवलेली आहेत.

गणेशोत्सवासाठी एक दिवस शिल्लक असल्यामुळे मुंबईतील चाकरमानी एसटी, खासगी गाड्या व वाहनांमधून गावाकडे परतू लागले आहेत; मात्र पावसाच्या जोरदार सरी, महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले भलेमोठे खड्डे, चौपदरीकरणाची सुरू असलेली कामे, रस्त्यासह आणि पुलांची अपूर्ण कामे यामुळे रायगड, खेड, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी या टप्प्यात ठिकठिकाणी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती. खेड भरणेनाका येथे आज सकाळपासून पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दहा ते बारा तासांत पोहचणारे चाकरमानी सोळा ते सतरा तासांचा प्रवास करून रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत होते.

दोन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा ठिकठिकाणी लागलेल्या पाहायला मिळत होत्या. राज्य शासनाने कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी केलेली टोलमाफी खासगी वाहनचालकांच्या पथ्यावर पडली. भक्तांनी बुधवारी रात्रीपासूनच कोकणच्या दिशेने प्रवास सुरू केला. या मार्गावर अतिरिक्त दीड हजार एसटी बसेस सोडल्यामुळे वाहनांच्या संख्येत भर पडली. मुंबई-गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहने वळवलेली आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची पुरती दमछाक झाली.

रामवाडी, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाडदरम्यान महामार्गाचे काम अर्धवट असून खेड- भरणे नाक्याजवळ वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कशेडी टॅपचे वाहतूक पोलिस आणि खेड पोलिस महामार्गावर तैनात केले होते. या काळात अवजड वाहनांना बंदी केली असली तरीही महामार्गावरील अर्धवट कामांचा फटका चाकरमान्यांना बसला. चिपळूण शहरातून जातानाही वाहनचालकांची पुरती दमछाक झाली. बहादूरशेख नाक्यावरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे तिथे वाहनचालकांचा वेग मंदावलेला होता.

पुढील मार्ग सुरळीत असला तरीही काही ठिकाणी चौपदरीकरणाची कामे सुरू असल्यामुळे कासवगतीने वाहने चालवावी लागत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील सोनवी पुलावर एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे पुलाच्या दुतर्फा वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूककोंडी दरम्यान अवजड वाहतूक करणारी वाहने येत राहिल्यामुळे या वाहतूककोंडीत अधिकच भर पडली. एसटी बस आणि रेल्वेचे तिकीट मिळाले नाही, असे गणेशभक्त खासगी वाहनांचा आधार घेऊन कोकणात दाखल झाले आहेत. कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

संगमेश्वर सोनवी चौक येथे पुलाचे आणि पैसाफंड हायस्कूल येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सर्व्हिस रोडच्या अरूंद रस्त्यावरून सुरू आहे. आरवली ते बावनदी या अपघातप्रवण परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिवसभर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावलेला होता. काही वाहनचालक रांगेत न थांबता उजव्या बाजूने वाहन काढत असल्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. बेजबाबदार वाहनचालकांवर वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती.

६०० हून अधिक पोलिस महामार्गावर – प्रशासनाने गणेशभक्तांचा प्रवास सुकर होण्यासाठी ६०० हून अधिक पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी तैनात केले होते. या महामार्गावर मोटारसायकल पेट्रोलिंगही सुरू होते. वाहतूक कोंडीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे तैनात ठेवले आहेत, तसेच संगमेश्वर येथे बसस्थानकाबाहेर एसटी बसेसची ये-जा होत असल्यामुळे दरवर्षी होणारी कोंडी लक्षात घेऊन येथील बसस्थानकाबाहेर पोलिस तैनात केले आहेत.

मलकापूरमार्गेही विलंब – मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी होत असल्यामुळे काही चाकरमानी मलकापूरमार्गे रत्नागिरीत येत होते; मात्र तिथेही आंबाघाटात अडचणी निर्माण झाल्या होत्या. चौपदरीकरणाच्या कामांमुळे खोळंबा होत होता. नागपूर- मिऱ्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पावसामुळे आंबा घाटातील रस्त्यावर चिखल साचला असून, वाहने हाकणे कठीण जात होते. त्यामुळे दोन तास विलंब होत होता.

RELATED ARTICLES

Most Popular