नाताळची सुटी, मंदगतीने सुरू असणारी पुलांची कामे, रखडलेले चौपदरीकरणाचे काम यामुळे संगमेश्वरात मुंबई-गोवा महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी होत असून वाहनचालक, प्रवासी यांना पुढे जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी नाक्यात वाहतूककोंडी होत असून, अवजड वाहने या वाहतूककोंडीत अडकून पडत आहेत. सोनवी पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गाची वाहतूक सुरळीत होईल अशाप्रकारे नाक्यामध्ये व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र, कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता वाहतूक सुरू असल्याने सोनवी नाक्यामध्ये कोंडी होत आहे. कोल्हापूर, देवरूखकडे जाणाऱ्या वाहनांनाही या कोंडीचा फटका बसत आहे.
गेले अनेक दिवस कोंडीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले असून, ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सोनवीपुलावर वारंवार खड्डे पडले असूनही खड्डे बुजवले जात नसल्याने दुचाकीस्वारासह अन्य वाहनांचा अपघात होण्याची भीती आहे. अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यावर धुळीमुळे वाहने चालवताना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. एका बाजूला चौपदरीकरणाची कामे सुरू आहेत; पण दुसऱ्या बाजूला वाहनचालक आणि प्रवाशांना गृहीत न धरता रस्त्याचे काम सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पुलावर एकावेळी एकच अवजड वाहनाचा प्रवास – अवजड वाहतूक आणि आलेल्या पर्यटकांची परत गावी जाण्याची गडबड यामुळे संगमेश्वरमध्ये प्रचंड वाहतूककोंडी झाली. एसटी, मोठे ट्रक, मोटारी, दुचाकी यांच्या लांबच लांब रांगा दोन्ही बाजूला लागल्या होत्या. सोनवी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस वाहतूक नियंत्रण करत होते. मात्र, पुलावरून अवजड वाहने एकावेळी एकच जात असल्याने वाहतूककोंडीत भर पडत होती. या ठिकाणी सोनवी पुलाच्या दोन्ही बाजूला नवीन पुलांची कामे सुरू आहेत. त्यासाठीचे सामान महामार्गाशेजारीच ठेवलेले आहे. तसेच, संगमेश्वर बाजारपेठ, बसस्थानकही महामार्गावरच आहे. त्यामुळे चारही बाजूने येणारी वाहने सोनवी चौकात येत असल्याने कोंडी होत आहे.