वाहतूक पोलीस आपले काम प्रामाणिकपणे बजावत असताना, एकाद्या चुकीमुळे अनेक वेळा वाहनचालकांच्या मात्र डोक्याला ताप होतो. आणि सध्या जग ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करत असल्याने वाहतूक पोलीस सुद्धा दंड आकारणी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच करतात. परंतु, वाहतूक पोलिसांची ऑनलाइन दंड आकारणी प्रणाली अनेकदा काहींना डोकेदुखी ठरत असते.
कल्याण पूर्व मलंग रोड द्वारली गावात राहणारे गुरुनाथ चिकणकर हे एक रिक्षा चालक असून, त्यांच्या मोबाईलवर आलेल्या या ऑनलाईन दंडाचे चलान पाहून त्यांना घाम फुटला आहे. मुंबईच्या कांदिवली भागात ३ डिसेंबर रोजी एक दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करत होता. त्याचा फोटो वाहतूक पोलिसांनी काढला. आणि रिक्षा चालकाला विना हेल्मेट वाहन चालवण्याचा दंड ठोठावण्यात आल्याचे चलन असल्याचे समोर आले आहे.
मात्र आता या दुचाकी चालकाचा दंड ऑनलाईन प्रणालीच्या ई-चलानद्वारे रिक्षा चालक गुरुनाथ या रिक्षा चालकांना आकारण्यात आला आहे. सुरुवातीला मोबाईलवर या दंडासंबंधी मेसेज आल्यानंतर रिक्षा चालक गुरुनाथला धक्काच बसला, नक्की वाहतूक पोलिसांचा काय गजब कारभार आहे तेच त्याच्या लक्षात येईना. म्हणून त्याने या प्रकरणी कल्याण वाहतूक पोलिसांना विचारणा केली असता त्यांना ठाण्याला जाण्यासाठी सांगण्यात आले.
परंतु जर हे चलान माझे नाहीच आणि यामध्ये माझी काहीच चूक नसताना मी ठाणे येथे का जावे? अशी थेट विचारणा त्यांनी पोलिसांना केली. त्यामुळे गुरुनाथ यांनी सांगितले कि, या सगळया प्रकरणामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. वाहतूक पोलिसांनी केलेली चूक त्यांनी सुधारून द्यावी आणि या प्रकरणात लवकरात लवकर आपल्याला आलेला दंड आणि नोटीस रद्द करण्याची मागणी गुरुनाथने केली आहे.