व्हेल माशाच्या १० किलो वजनाच्या उलटीची तस्करी केल्याच्या आरोपाखाली चौघांवर वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. शहरानजिकच्या वालोपे येथे मुंबई गोवा महामार्गावर एच.पी पेट्रोल पंपासमोर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये व्हेल माशाची उलटी देखील जप्त केली आहे. या चौघा संशयीतांमध्ये एका व्यावसायीकासह बीएचएमएस डॉक्टरचाही समावेश आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून प्रकाश तुकाराम इवलेकर, (६०), दिलीप पांडुरंग पाटील ( ५०, दोघेही रा.वेळवी ता. दापोली), प्रविण प्रभाकर जाधव (४७ रा. मंडणगड), अनिल रामचंद्र महाडीक ( ४७ रा. अडखळ ता. मंडणगड) या चौघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई केली आहे. गतवर्षी सलग दोन वेळा व्हेल माशाच्या उलटी प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतर आता सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी बाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार म ागील काही दिवसांपासून ट्रॅप लावण्यात आला होता. वनविभागाने एका बनावट ग्राहकाद्वारे संबंधीत संशयीतांकडे व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना संबंधीतांकडे व्हेल माशाची उलटी त्यांच्याकडे असल्याची खात्री पटली. त्यानुसार वालोपे येथे सापळा रचून या चौघांवर धडक कारवाई करीत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे १० किलोची उलटी जप्त केली.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या उलटीला कोट्यावधीची किंमत मिळत असल्याने तिची तस्करी केली जाते. या घटनेतही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संशयीत म्हणून अटक केलेल्या चौघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेतल जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटी सोबतच संबंधीतांनी वापरलेल्या दोन दुचाकी वनविभागाने जप्त केल्या आहेत. संशयीत आरोपींवर वन्यजीव (सरंक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम रामानुजम, विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रं. शि. परदेशी, परिक्षेत्र वन अधिकारी फ़िरते पथक आर. आर. पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली .प्र. ग. पाटील, सामाजीक वनिकरणचे वनक्षेत्रपाल एम. एम डबडे, एम. व्हि. पाटील, सा. स. सावंत, रा. द. खोत, एन. एस. गावडे, राहुल गुंठे, अशोक ढाकणे, राणबा बंबर्गेकर, सुरज जगताप, सुरज तेली, अरुण माळी, विशाल पाटील यांनी सहभाग घेतला.