कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून त्यामुळे नव वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात आलेले पर्यटक आणि पर्यटकांची गोव्याला जाणाऱ्या रखडपट्टी होताना पहायला मिळाली. विशेषतः तेजस एक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. ‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन करण्यासाठी कोकण आणि गोव्याला ‘चाललेल्या पर्यटकांची बुधवारी कोकण रेल्वे मार्गावर रखडपट्टी झाली. पनवेल येथील ब्लॉक तसेच उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या विशेष गाड्यांचा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मंगळवारी रात्री मुंबईत येणारी तेजस एक्प्रेस बुधवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली. त्यामुळे परतीच्या प्रवासातही तिचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष गाड्यांसाठी नियमित गाड्या ‘सायडिंग’ला ठेवल्या जात असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई-ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक कोकण आणि गोव्याला जातात. किंबहुना, उत्तर हिंदुस्थानातून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे नियमित गाड्यांबरोबर विशेष गाड्यांचा कोकण रेल्वे मार्गावर ताण येतो.
अशातच मध्य रेल्वेने पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या त्रासात भर घातलीः मंगळवार पाठोपाठ बुधवारी नियमित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. मडगावहून सीएसएमटीला येणारी तेजस एक्सप्रेस मंगळवारी रात्री १२.३० वाजता पोहोचण्याऐवजी बुधवारी सकाळी ६.३० वाजता दाखल झाली. त्यामुळे तिचा मडगावच्या दिशेने सुरू होणारा परतीचा प्रवास खोळंबला. एरव्ही पहाटे ५.५० वाजता सीएसएमटीहून सुटणारी तेजस एक्प्रेस बुधवारी ५ तास उशिराने म्हणजेच ११ वाजता सुटली. याचा गोव्यात जाऊन ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचा बेत आखलेल्या प्रवाशांना फटका बसला. गाडीची संपूर्ण प्रवासात रखडपट्टी होत गेली. ही गाडी चिपळूण स्थानकात सवा सात तास उशिराने पोहोचली. इतर नियमित गाड्यांच्या वेळापत्रकावर विशेष गाड्यांचा परिणाम झाला.
कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने ‘तेजस एक्सप्रेस’च्या जागी ‘वंदे भारत’ ट्रेन चालवावी. जेणेकरून रेल्वे बोर्डाचे या गाडीकडे विशेष लक्ष राहील तसेच रत्नागिरी, कुडाळसारख्या स्थानकांतील प्रवाशांना ‘वंदे भारत’ गाडीचा पर्याय उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय म्हापदी यांनी दिली.

