दिवा-रत्नागिरी आणि दिवा-दादर या मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देत ही गाडी बंद करण्यात आली; मात्र मध्यरेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावर दादर-गोरखपूर (चार दिवस) आणि दादर-बलिया (तीन दिवस) विशेष गाड्या सुरू केल्या. १ जानेवारीपासून नवीन वेळापत्रकात या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. याचाच अर्थ या गाड्या आता कायमस्वरूपी झाल्या आहेत. कोकण आणि मुंबईतील रेल्वेगाड्या महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याच्या या कृतीचा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. संघटनेचे सचिव अक्षय म्हापदी म्हणाले, १९९६-९७ पासून रत्नागिरी लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर एक पॅसेंजर गाडी सुरू झाली. पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार ती रत्नागिरी-दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वसई, नालासोपारा, विरार आणि गुजरात दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानक सोयीची होती.
परंतु कोरोनाच्या नावाखाली मध्यरेल्वेने सप्टेंबर २०२१ पासून ही गाडी सुरू करताना मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत बंद केली व नवीन शून्य आधारित वेळापत्रकात दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू केली; परंतु, आजही रत्नागिरी पॅसेंजरच्या वक्तशीरपणात काहीही बदल झालेला नाही. उलट, दादरवरून येत असताना तेथेच गाडीत पाणी भरले जात असल्यामुळे ही गाडी पनवेलहून थेट निघू शकत होती; परंतु आता दिव्यात तशी सोय नसल्यामुळे येता-जाता दोन्ही वेळेस पनवेलला १० ते २० मिनिटे वाया जातात. यामुळे मागील गाड्या पुढे काढाव्या लागतात; ज्यात आणखी अर्धा तास वाया जातो व गाडीला आणखी उशीर होतो. त्यामुळे गाडी दादरहून दिव्याला नेल्यामुळे वक्तशीरपणा तर सुधारला नाहीच उलट प्रवाशांच्या त्रासात भर पडली. याच शून्य आधारित वेळापत्रकात मुंबई, कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, पुणे-कर्जत -पनवेल पॅसेंजर, मनमाड मुंबई गोदावरी एक्स्प्रेस अशा महाराष्ट्राच्या राज्यांतर्गत व इंटरसिटी गाड्या निवडून बंद करण्यात आल्या.