पूर्वी नदीकाठी असणाऱ्या गावांना वाहतुकीसाठी दुसर्या गावात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने होडीने प्रवास करावा लागत असे. रस्ते किंवा पूल नसल्याने शहराच्या ठिकाणी काही कामासाठी, विद्यार्थी शिक्षणासाठी अशा प्रकारे जीवघेणा प्रवास करून येत असत. रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही तशीच परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी आता पुलाची, किंवा रस्त्यांची सोय करण्यात येत आहे.
गोठणे-दोनिवडे आणि आंगले गावांना जोडणारा अर्जुना नदीवरील पूलाचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे होडीतून कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासातून लोकांची आता कायमची सुटका झाली आहे. या पुलासाठी पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्या कामाची आता पूर्तता झाली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक शिवसैनिक, पदाधिकारी, लोक प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या साथीबद्दल आमदार राजन साळवी यांनी त्यांचे प्रत्यक्ष कौतुक केले आहे.
त्यावेळी ग्रामस्थाना संबोधित करून, पंचक्रोशीतील विकासासाठी भविष्यामध्ये निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासित केले. यावेळी त्यांच्या हस्ते फित कापून गोठणे-दोनिवडे-आंगले पूलाचे लोकार्पण करण्यात आले. पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष अनिल भोवड यांच्या अध्यक्षतेखाली गोठणे-दोनिवडे आंगले पुलाचा लोकार्पण सोहळा रविवारी संपन्न झाला.
पंचक्रोशी ग्रामविकास समिती आणि कोदवली-केळवली शिवसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, विभागप्रमुख संतोष हातणकर, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, पंचायत समिती सभापती करूणा कदम, जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर आदी उपस्थित होते. अखेर होडीच्या जलप्रवासातून त्यांची कायमची सुटका झाल्याने ग्रामस्थांमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहेत.