खेड-शिवतर मार्गावरील मुरडे खेडेकरवाडी नजीक जळाऊ लाकडे वाहून नेणाऱ्या एका मालवाहू ट्रकने अचानक पेट घेतला. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवतरहून खेड दिशेने जळाऊ लाकडे वाहून घेऊन हा ट्रक (एमएच १७, क्यूजे ३७५१) निघाला होता. मुरडे खेडेकरवाडी नजीक येताच ट्रकने अचानक पेट घेतला. रस्त्यावर अचानकच ट्रक पेटल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांची एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ खेड नगरपरिषदेचा बंब मागवला. त्यानंतर ही आग आटोक्यात आणली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. परंतु ट्रक जळून खाक झाला. आंबये, जामगे, शिवतर, चिंचाळी, सातेरी जामगे या भागातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असते. या परिसरातून नेहमीच जळाऊ लाकडांची वाहतूक मुंबई- पूणे- कोल्हापूर या सारख्या मोठ्या शहरांतून होते. आज देखील अशीच वाहतूक सुरू असताना खेड- शिवतर मार्गावर ही घटना घडली.