वानर, माकडांचा बंदोबस्त करता येत नसेल तर शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन अविनाश काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहे. वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकरी आणि बागायतदार प्रचंड त्रासलेले आहेत. वानर, माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेती, भाजीपाला, बागायती करणे म्हणजे डोक्यावर कर्ज वाढवणे अशी परिस्थिती आहे. वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च होतात. शासन आणि प्रशासन याचा विचार करणार आहे की नाही ? जिल्ह्यातील शेतीक्षेत्रात सुमारे १ हजार हेक्टर घट झाल्याची अधिकृत कृषी कार्यालयीन आकडेवारी आहे.
प्रत्यक्षात घट झालेले क्षेत्र त्यापेक्षा जास्तच असेल. त्याचे कारण कृषी अधिकारी यांनी वन्यप्राणी उपद्रव हेच दिले आहे. गेले वर्षभर लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण, आंदोलन, हजारो पत्र शासनाला जाग आणण्यासाठी देऊन झाली; मात्र शासनाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील त्रस्त शेतकऱ्यांचे दुःख अजून कळत नाही. विविध पातळीवर वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत; मात्र सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे.
केंद्राकडे नसबंदी परवानगी न मागता मारण्याची परवानगी तत्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुरता उपाय आज संभाजीनगर, बुलढाणा आदी जिल्ह्यांत सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा २५ जानेवारीला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.