महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रिम कोर्टाकडे मुदत मागितली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली आणि कोर्टाने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्याआधी ३१ जानेवारी २०२ ६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र अनेक जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे निवडणुका घेण्याबाबत पेच निर्माण झाला होता. यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती. सोमवारी ती मिळाली.
१२ जिल्हा परिषदा – सोमवारी मुदतवाढीचा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर आयोगाने आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. उर्वरीत जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आरक्षणाची सोडत पुन्हा काढून घेण्यात येणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय २१ जानेवारीला सुप्रिम कोर्टात प्रलंबित असलेल्या एका याचिकेवरील सुनावणीनंतर होईल असे कळते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड – दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ज्या १२ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली नाही त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीनही जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. एकूण २५४८२ मतदान केंद्रे असणार असून १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. ईव्हीएमवर हे मतदान होणार असून प्रत्येक मतदाराला प्रत्येकी २ मते देतां येतील. त्यातील एक मत जिल्हा परिषद गटासाठी तर दुसरे मत पंचायत समिती गणासाठी असेल.
१२ जिल्हा परिषदांची निवडणूक – कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छ. संभाजी नगर, परभणी, लातूर, धाराशीव या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
असा आहे कार्यक्रम – १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची अधिसूचना जिल्हाधिकारी १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध करतील. या दिवसापासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. सर्व अर्ज ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येतील. १६ जानेवारी २१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. म्हणजेच उमेदवारी अर्ज सादर करण्याचा २१ जानेवारी हा अखेरचा दिवस असेल. २१ जानेवारीला दुपारी ३ वाजल्यानंतर दाखल उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल.
२७ जानेवारीपर्यंत माघार – उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजपर्यंत मुदत असेल. २७ जानेवारीला दुपारी ३.३० वाजल्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.
५ फेब्रुवारीला मतदान – या सर्व ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होईल. ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. हा कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
सर्वच पक्षांकडून स्वागत – दरम्यान महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना आणि त्यासाठी होणारे मतदान जवळ आले असतानां जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांचे स्वागत केले आहे. आता त्यांची लगीनघाई सुरु झाली आहे.

