तुळशीचा विवाह म्हणजे जसे आपल्या घरातील कन्येचा विवाह लावला जातो त्याप्रमाणेच कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. परंतु प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह संपन्न केला जातो. या नंतरच लग्नाच्या मुहूर्तांनाही सुरुवात होते.
तुळसी विवाह या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सोमवारपासून सुरु झाली आहे. या दिवशी एकादशी सकाळी ६.३९ वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२६ वाजेपर्यंत तुळशी विवाहाचा मुहूर्त असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम अवतारासोबत, माता तुळशीचा विवाह केला जातो.
तुळशी विवाहाची अख्यायिका प्रसिद्ध आहे. जालंदर नावाच्या असुर हा देव लोकांना छळत होता. त्यांच्या अमानवी कृत्याने सगळेच देव आणि ऋषीमुनी खूप हैराण झालेले. कसाही करून त्याचा प्रभाव करून त्याला नामोहरम करण्याचा सगळ्यांचा मानस होता. पण त्याचा पराभव करणे देवांना जमत नव्हते.
कारण असुर जालंदरची पत्नी वृंदा ही अतिशय पुण्यवान असल्याने, तिच्या पुण्याईने जालंदरचा नाश करणे देवांनाही शक्य होत नव्हते. अशा वेळी वृंदेची पवित्रता भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा नाश करणे अशक्यप्राय गोष्ट आहे इथपर्यंत विचारापर्यंत देवलोक पोहचले. एकदा जालंदर नसताना त्याचे रुप घेऊन विष्णूनी त्याची पत्नी वृंदाचे सत्व हरण केले. त्यामुळे तिची पवित्रता नष्ट झाली आणि जालंदरचा पराभव करण्यात यांना यश आले.
परंतु, वृंदाने देहत्याग करण्यापुर्वी भगवान विष्णूंना शाळिग्राम होण्याचा शाप दिला. परंतु, भगवान विष्णूनी मात्र वृंदेच्या निस्सीम पतिव्रतेमुळे संतुष्ट होऊन तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला. पुढे सती वृंदा हिच तुळशी रूपाने प्रगट झाली. वृंदेचे महात्म वाढावे म्हणून विष्णूंनी तुळशीसोबत लग्न केले. तेव्हापासून आपल्या समाजात तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते.