आजीचा वाढदिवस आणि उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या दोन कुटुंबातील २ शाळकरी मुलांचा भांबेड. येथील मुचकुंदी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी लांजा पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या विरार (ईस्ट) येथे राहणाऱ्या संगीता तुकाराम पवार या आपल्या मयुरी कमलेश घोसाळकर (१५ वर्षे) तसेच प्रतिक्षा कमलेश घोसाळकर (१२ वर्षे) या २ मुलींसह गावी आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या मैत्रिणीची मुले सुशील गुंडाप्पा तांबळे (१४ वर्षे) आणि तन्मय गुंडाप्पा तांबळे (१० वर्षे, दोघेही राहणार वरळीनाका मुंबई) हीदेखील आली होती. संगीता पवार यांची आई वनिता तुकाराम पवार (६६ वर्षे) यांचा सोमवारी १० एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने ही सर्व मंडळी रविवारी ९ एप्रिल रोजी इको कारने मुंबईहून तालुक्यातील गोविळ बौध्दवाडी या आपल्या मूळगावी आली होती.
आंघोळीसाठी नदीत उडी:- मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी जेवण आटोपून हे सर्वजण नजीकच्या भांबेड – खोरनिनको प्रभानवल्ली फाट्याजवळील सर्व्हिसिंग सेंटरच्या खालच्या बाजूला असलेल्या मुचकुंदी नदीपात्रात आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत वनिता पवार तसेच इको कार चालक रुपेश कोंडीभाऊ कंदारे असे एकूण सातजण नदीवर गेले होते. आजी वनिता आणि संगीता या कपडे धुवत असताना मयुरी घोसळकर हिने प्रथम नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी उडी घेतली. मात्र नदी पात्राचा व नदीतील मोठ्या कोंडीचा (कातळकडा) अंदाज न आल्याने ती पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत मयुरी हिने आपल्या आईला हाका मारल्या. तिचा आरडाओरडा ऐकून सुशील तांबळे याने मयुरीला वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी मारली. मात्र त्यालाही पोहता येत नसल्याने ती दोघेही या नदीपात्रात बुडाली आणि त्यांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
वाचवण्याचा प्रयत्न:- या दोघांना वाचविण्यासाठी सोबत असलेल्या आजी वनिता, आई संगीता आणि इको कारचालक रुपेश कंदारे यांनी आरडाओरडा करून नजीकच्या भांबेड- कोलें मार्गावरील वाहनचालकांना थांबविले. त्यानंतर वाहनचालकांनी धावत जावून मदत केली. स्थानिक नागरिकांनी दोन्ही मुलांना नदीपात्रातून बाहेर काढून जवळच्या भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून या दोघांनाही मृत म्हणून घोषित केले.
तालुक्यात हळहळ:- त्यानंतर त्या दोघांचेही देह शवविच्छेदनासाठी सायंकाळी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्या दोघांचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेनंतर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.