शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून सुमारे २५ हजार रोकड आणि पितळेच्या छोट्या वस्तू पळविल्या. जयस्तंभ येथील शकुंतला अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. चोरट्याने कडी-कोयंडा उचकटून अवघ्या दीड तासात हात साफ केला. भरवस्तीत भरदिवसा चोरीमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. ठसे तज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले, तर पोलिसांकडून जवळील बँकेतील सीसीटीव्ही तपासून फूटेज मिळवण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील स्टेट बँकेला लागून शकुंतला अपार्टमेंट आहे. पहिल्या मजल्यावर सागर सुनील साळवी आणि सुनील चव्हाण यांचे लागून फ्लॅट आहेत. साळवी आज सकाळी नऊ वाजता फ्लॅट बंद करून रुग्णालयात गेल्या होत्या, तर बाजूच्या चव्हाण यांचा फ्लॅट बंद असतो. दहा-साडेदहाच्या सुमारास वरच्या मजल्यावरील सौ. इंदुलकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. काम आटोपून परत आल्या तर साळवी यांच्या फ्लॅटच्या दरवाजाला कडी होती आणि कोयंडा उचकटला होता.
त्यांनी घरात जाऊन पाहिले तर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी तत्काळ साळवी यांना फोन केला. बाहेर येऊन बघितले तर बाजूच्या घराचाही कोयंडा उचकटला होता. त्या फ्लॅटमध्येही चोरी झाली होती. याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. लगेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे व त्यांचे सहकारी आले. काही वेळाने उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर दाखल झाले. इंदुलकर यांनी साळवी यांच्याशी संपर्क साधून नेमके घरात काय होते आणि काय गेले, याची महिती घेऊन ती पोलिसांना दिली. चोरट्यांनी अवघ्या दीड तासामध्ये ही घरफोडी केली. त्यांनी कपाटे फोडून त्यामधील हाताला लागेल तेवढा ऐवज पळविला. साळवी यांच्या घरात सुमारे ३० हजार रोकड होती. त्यापैकी पाच ते सहा हजार चोरट्यांच्या हाती लागले. बाजूला अडीच तोळ्याचे मंगळसूत्र होते. सुदैवाने ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. चव्हाण यांच्या फ्लॅटमध्येही त्यांनी कपाट फोडून सर्व सामान विस्कटून टाकले; परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही; मात्र त्यांनी समई, पेले, निरंजन, वाटी अशा पितळेच्या वस्तू चोरीला गेल्याचे पोलिसांना सांगितले.
श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण – पंचनामा उशिरापर्यंत सुरू होता तसेच श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाचा सीसीटीव्ही त्या बाजूला आहे, त्याचे फुटेज मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. उशिरापर्यंत या चोरीबाबत शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.
नवीन इमारतीतील कामगारांवर संशय – शकुंतला अपार्टमेंटच्या बाजूला इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीमधील परगावच्या कामगारांनी पाळत ठेवून ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. याची शहानिशा पोलिसांनी सुरू केली आहे. भरदिवसा ही चोरी झाल्याने पोलिसांनी देखील सर्व बाजूनी तपास सुरू करून या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी चंग बांधला आहे.