26 C
Ratnagiri
Saturday, November 22, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRajapurराजापुरात वीज पडून दोघे जखमी; घराचे नुकसान

राजापुरात वीज पडून दोघे जखमी; घराचे नुकसान

विजांचे तांडव सुरू झाले आणि ढगांचा गडगडाटही सुरू झाला.

वळवाच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काल (ता. १५) मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसासह विजांचे तांडव आणि ढगांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जवळेथर (ता. राजापूर) येथे वीज पडून दोघेजण जखमी झाले आहेत. निरूळ कोसले व सुतारवाडी (ता. रत्नागिरी) येथे वीज पडून घरातील इलेक्ट्रिक वस्तूंसह झाडांचे ६० हजारांचे, तर गोळप येथे शॉर्टसर्किटमुळे २८ आंबा कलमे आगीत भस्मसात झाल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने अजून दोन दिवस पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे. मागील चार दिवसांत जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला आहे. काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचे तांडव सुरू झाले आणि ढगांचा गडगडाटही सुरू झाला.

रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाला. काहीठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या लोखंडी खांबांवर वीज पडल्यामुळे इन्सुलेटर फुटत होते. परिणामी वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. अर्धा-एक तासानंतर पावसाचा जोर ओसरला, परंतु रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस पडला असला तरीही हवेत प्रचंड उष्मा होता. दोन दिवसांपूर्वी लांजा गोविळ येथे वीज पडून एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला होता. राजापूरसह रत्नागिरी तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडली.

काल पहाटे अडीचच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील पावस परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. गोळप, गुरववाडी येथील गजानन रामचंद्र गुरव यांच्या आंबा बागेमध्ये अचानक वीज खांबावर पडली. बागेतून जाणाऱ्या विजवाहिनीवर शॉर्टसर्किट झाल्याने गुरव यांच्या बागेतील २८ कलमांचे नुकसान झाले. या बागेतील २० कलमे १५ ते २० वर्षांची होती. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. निरूळ, कोसले, सुतारवाडी येथील जयवंत दिनकर मिस्त्री यांच्या घराजवळील माळावर रात्री अडीच ते तीनच्यादरम्यान वीज कोसळून माडाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या घरामधील विद्युत उपकरणे जळाली असून, त्यांच्या विहिरीवरील पाण्याचा पंप जळून खाक झाला. त्यामध्ये सुमारे साठ हजारांचे नुकसान झाले आहे.

लांजा-राजापूर तालुक्यालाही पावसाने झोडपले आहे. राजापूर तालुक्यातील जवळेथर येथे वीज पडून दोन कामगार जखमी झाले आहेत. हा प्रकार आज दुपारी सव्वातीन वाजता घडला. प्रकाश अंबाजी मोरे (वय ५२), विलास शिवाजी धावडे (४३) असे त्या जखमींची नावे आहेत. शुक्रवारी दुपारनंतर जवळेथर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. प्रकाश मोरे व विलास धावडे हे गावात बांधकाम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जवळेथर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular