मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक खुली झाल्याने चाकरमान्यांचा प्रवास सुसाट झाला. दरम्यान बोगद्यालगतच्या पोलादपूर हद्दीतील भौगाव्रनजीक पुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्यातील अंतर्गत कामेदेखील अंतिम टप्यात आली आहेत.. एप्रिल अखेरपासून कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू होईल, असे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी मंगळवारी दिले. यामुळे प्रवास आणखी सुसाट अन् वेगवान होणार आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ फेब्रुवारीपासून बोगद्यातील एकेरी वाहतूक खुली झाल्याने प्रवास सुसाट झाला होता.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना मुभा देत वेगावर देखील मर्यादा घालण्यात आली होती. बोगद्यातील वाहतूक सुरू झालेली असतानाच बोगद्यानजीक पुलावर गर्डर चढवण्याच्या कामामुळेङ्ग वाहतूक ३ दिवस बंद ठेऊन पुन्हा सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत बोगद्यातील अंतर्गत कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बोगद्यालगतचे प्रलंबित असलेले काम देखील पूर्ण झाले असून बोगद्यात १० पंखेही बसवण्यात आले आहेत. एका बाजूकडील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूकडील काम देखील हाती घेण्यात आले आहे.
सात मिनिटात अंतर पार होणार – भोगावनजीक पुलाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून हे काम देखील येत्या १५ दिवसातच पूर्ण होईल. यामुळे एप्रिलअखेरपासून कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतूक सुरू होणार आहे. कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाल्यास मुंबईहून गोव्याकडे व गोव्याहून मुंबईकडे बोगद्यातून प्रवास करताना अवघ्या ७ मिनिटातच अंतर पार करणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवास तितकाच वेगवान अन् आरामदायी होणार असून वाहनचालकांच्या वेळेची बचतही होणार आहे.