उत्तर प्रदेशात शांततेने निघालेल्या शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्यात आले. या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी भाजप विरोधी पक्षांच्यावतीने महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे. त्या दिवशी सर्वांनी दुकाने बंद ठेवा, रस्त्यावर जास्त वर्दळ होऊ देऊ नका. देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांच्या वाट्याला कोणीही गेले, तरी या देशातील माणूस मूग गिळून गप्प बसणार नाही, त्यांच्या न्यायासाठी हा लढणारच असा स्पष्ट संदेश या बंदमधून केंद्राला द्यायचा असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेमध्ये एका आजी माजी मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढविल्याने झालेल्या घटनेत काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. परंतु, उत्तर प्रदेश सरकार संबंधिताना शासन करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीने सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद जाहीर केला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने व व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे रत्नागिरी जिह्यातील व्यापारी कोरोना पाठोपाठ अतिवृष्टी व महापुरामुळे आधीच आर्थिक संकटामध्ये अडकलेले आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी संघटना बंदबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे. मात्र अद्याप तरी व्यापारी संघटनांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.