दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या उधाणामुळे नुकसान होणाऱ्या मिऱ्या गावच्या संरक्षणासाठी १६९ कोटी रुपये निधी मंजूर आहे. २६ डिसेंबरला दुपारी ३ वाजता या बंधाऱ्याचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तेथील किनाऱ्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी २५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
मंत्री सामंत अल्पबचत कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. तेंव्हा त्यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अॅड. अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पावसाळ्यात उधाणाच्या लाटांमुळे मिऱ्या गावाला सातत्याने धोका निर्माण होत असतो. अनेक समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरते. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी, अनेक वर्षे मागणी करण्यात येणारा सुरक्षित बंधारा अखेर उभारला जाणार आहे. या बरोबरच अनेक विकास कामेही मंजूर झाली असून काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
इतर विकासकामांबद्दल बोलताना नाम. सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरी शहरातील १०५ रस्त्यांच्या कामासाठी ३४ कोटी निधी आला असून त्यातील ३४ कामे पूर्ण झाली आहेत. अंतर्गत रस्त्यांसाठी आणखी पाच कोटी अतिरिक्त निधी मिळणार आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी तीन एकर जागा एमआयडीसीमधील निश्चित करण्यात आली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात होणार आहे. रत्नागिरीत प्रथमच चालू होत असलेल्या शासकीय इंजिनिअरींग कॉलेजच्या पहिल्या वर्षाला ८२% प्रवेश झाले आहेत. या कॉलेजच्या इमारतीसाठी ४५ कोटी रुपये मंजूर असून पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ६० लाख रुपये मिळणार आहेत. शहरातील चौकांचे सुशोभिकरणाचे काम मारुती मंदिर येथून सुरु झाले असून त्यासाठी ५ कोटी रुपये मंजूर आहेत. त्याचप्रमाणे, टिळक स्मारकासाठी रचना आर्कीटेक्ट कॉलेजची मदत घेतली जाणार असल्याचे नाम. सामंत यांनी सांगितले.