संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशन काळात निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेतील १२ खासदार धरणं आंदोलन करत आहेत. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट दिली. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांची शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची देतानाचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये लगबगीने पवारांना खुर्ची देण्यासाठी राउतांची सुरु असलेली घाई दिसून येत आहे.
आणि या व्हायरल झालेल्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी सुरु केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे मग राणे बंधुं तरी मागे कसे राहतील! त्यांनीही राऊतांना खोचक टोमणे मारले आहेत.
त्यामध्ये अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे कि, धरणे आंदोलन देणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते गेले, तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला आपले उगीच वाटत होते, की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू आहेत, पण आज खरे समोर आले त्यांचे खरे गुरू तर शरद पवारच.
अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटला शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तो फोटो महाराष्ट्रातील राजकीय परंपरेचा आहे. एखाद्या देशातील वरिष्ठ नेता जे सर्वांचेच मार्गदर्शक आहेत, ज्यांचा सल्ला, मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घेतात, अशी वयाने आणि मानाने जेष्ठ व्यक्ती समोर उभं असताना त्यांना खुर्ची देणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची प्रथा-परंपरा आहे. राऊत साहेबांनी परंपरा जपण्याचा पारंपरिक प्रयत्न केला आहे. जे संस्कृती विसरले त्यांनी अशा पद्धतीचे ट्विट करणे योग्य आहे असे मला वाटत नाही, असे चोख प्रत्युत्तर नाम. सामंत यांनी दिले आहे.