रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदय सामंत भाजपचे उमेदवार बाळ माने यांचा पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद दांडगी आहे; परंतु शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात रत्नागिरी मतदार संघ भाजपच्या वाट्याला आल्यामुळे शिवसेनेची या मतदार संघातील ताकद कधी समोर आलीच नाही. २०१४ च्या निवडणुकीत उदय सामंत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढले असते, तर त्यांचा दारुण पराभव झाला असता. त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची भरभराट व्हायला सुरूवात झाली.
रत्नागिरीतील शिवसेनेमध्ये सद्यःस्थितीत दोन गट निर्माण झाल्याचे चित्र आहे. सामंत यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील जुना गट सक्रिय झाला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात बंडखोरी करून सामील झालेले रत्नागिरीचे आम आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांची मतदार संघात वैयक्तिक ताकद खूपच मोठी आहे. त्यामुळे अडीच वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते जरी भाजपच्या तिकिटावर उभे राहिले तरी निवडून येतीलच असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत यांना कायमच झुकते माप दिले. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांनी सामंत यांच्याशी जुळवून घेण्यालाच प्रथम प्राधान्य दिले. सामंत यांनी मात्र एक विशेष काळजी घेतली ती म्हणजे पक्षाचे नेते असो किंवा प्रशासन आपल्या विरोधात जाणार नाही, याची विशेष खबरदारी त्यांनी कायमच घेतली. जरी राष्ट्रवादी पक्ष सोडला असला तरी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे अजूनही संबंध तेवढेच घनिष्ठ आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक असो किंवा विरोधी पक्षातील विरोधकांवर वर्चस्व मिळवण्यात सामंत कायमच एक पाउल पुढे आहेत.
रत्नागिरीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिल्यामुळे रत्नागिरीमध्ये आता सामंत गट विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळणार आहे.