राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मंगेशकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे भूमिपूजन लता दिदींच्या हस्ते होणार होते मात्र, दुर्दैवाने ते होऊ शकले नाही परंतु, लता दिदींचे स्वप्न पूर्ण करणार आहे, असे जाहीर आश्वासन मंगेशकर कुटुंबियांना दिले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले अख्ख जग लतादिदींना ओळखते, लतादिदींबरोबर मला अडीच वर्षापूर्वी संपर्क साधण्याची संधी मिळाली होती. मात्र कालपर्यंत असे कधीही वाटले नाही की त्यांची नव्याने ओळख झाली आहे. गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी आपले प्रस्थ अवघ्या विश्वात निर्माण केलं. त्यांच्या जाण्यामुळे फार मोठी पोकळी सांस्कृतिक विश्वात निर्माण झाली आहे. माझा वाढदिवस असेल किंवा त्यांचा वाढदिवस असेल तेंव्हा आम्ही एकमेकांशी संवाद साधत होतो. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने आंतरराष्ट्रीय महाविद्यालय सुरु करण्याचे स्वप्न होते. त्या संबंधित खात्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा देखील करत आहे.
महाविद्यालयाची रचना कशी असली पाहिजे याबाबत अनेक वेळा फोन वरून त्याची चर्चा होत असत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या शुभेच्छा पत्र लिहित होत्या. खरच एक संवेदनशील व्यक्तीमत्व भारताने गमावले आहे. मात्र एक निश्चित झाले होते, कोरोना संपल्यावर त्यांना भेटणार होतो. संगीत महाविद्यालयाविषयीच्या संकल्पना त्या मला सांगणार होत्या. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. पुढील काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय काही दिवसातच उभे करून लतादिदींना खरी श्रद्धांजली वाहू, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केली.