मागील वर्षापासून कोरोनामुळे राज्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये १२वी आणि त्याआधी १० वीचा रिझल्ट लागल्याने आता पुढील कॉलेजच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु झाल्या असून, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आजपासून राज्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सांगितले आहे.
देशासह राज्यासह, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणली असून, अनलॉकचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे हळू हळू कोरोना परिस्थिती कंट्रोल मध्ये येत असून, आज सामंत यांनी कॉलेज कधीपासून सुरू होणार या सतत विचारल्या जाणार्या प्रश्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. लवकरच शैक्षणिक वर्ष ऑफलाईन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती.
कॉलेज आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. येत्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान राज्यात पुन्हा कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होणार नसून, त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
कोरोनाचे संक्रमण आणि पॉझिटीव्हीटी रेट यावर वारंवार लक्ष ठेवून, ज्या भागामध्ये परिस्थिती अनुकूल असेल, अशाच भागांमध्ये शैक्षणिक संस्था सुरु करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यामध्ये अजूनही काही ठिकाणी कोरोनाचे संक्रमण जास्त असलेल्या ठिकाणी प्रवेशप्रक्रिया सुरु असून, तिथे फक्त ऑनलाईन शिक्षण पद्धती या परिस्थितीमध्ये अवलंबली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.