रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर सर्कलमधील हनुमानाचे पुरातन मंदिर हे रत्नागिरीकरांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. रत्नागिरीतील मध्यवर्ती ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे सांगणार्यांचा मी जाहीर निषेध करतो. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत. या अफवा पसरवणाऱ्याला मारूती रायाच नक्की बघून घेईल. पालिकेने ट्रस्टींना कोणतीही नोटीस बजावलेली नाही. मारूती मंदिर स्थलांतर सोडाच मंदिराच्या दगडाला हातही लावण्याची कुणाची हिंमत नाही, असा सज्जड इशाराच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला.
शहरातील जयस्तंभ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मारूती मंदिरचे ट्रस्टी श्री. जोशी, पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर, नगररचना अधिकारी उपस्थित होते. मंत्री सामंत म्हणाले, अचानक हा विषय काढून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु नंतर लक्षात आले की आता पालिकेच्या निवडणुका आल्याने काहींनी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे कुंभाड रचलेले आहे.
मात्र पालिकेने देखील या अफवा पसरल्यानंतर लगेचच प्रेस नोट जाहीर करून मुख्याधिकारी बाबर यांनी खुलासा केला आहे. अशी कोणतीच नोटीस मारूती मंदिर स्थलांतरित करण्याबाबत ट्रस्टींना बजावलेली नाही. ट्रस्टींनी देखील आपल्याला सांगितले की अशी कोणतीही नोटीस आलेली नाही. मारूती मंदिर परिसरातील हनुमानाचे मंदिर हि रत्नागिरीकरांची अस्मिता आणि परंपरा आहे. त्यावरून एवढ खालच्या दर्जाच राजकारण करणे योग्य नाही. अशी पातळी गाठणाऱ्यांना मारुतीराया त्यांची योग्य ती पातळी दाखवून देईल असे समस्त रत्नागिरीकरांच म्हणण आहे.

