आघाडीतील मित्रपक्षांना माझे काम आवडले असेल तर ते मला मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा संधी देतील आणि कोणाची हरकत नसेल तर त्यांनीच मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे केले आहे. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून ते आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. याच दरम्यान त्यांना पत्रकारांनी राज्यातील आगामी धोरणाबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी डाव टाकला असून मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा समजला जात आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपंदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
…तर मी तयार! – तुमच्या मित्रपक्षातील नेते तुमच्या कामाचे नेहमीच कौतुकं करतात. लवकरच महाराष्ट्रात निवडणुका होत असून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा चेहरा कोण असेल असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना दिल्लीत विचारला गेला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, जर मी मुख्यमंत्री असताना माझ्या सहकाऱ्यांना माझे काम आवडले असेल तर मी पुन्हा मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडेल का असे त्यांनाच विचारा असे म्हणत गुगली टाकली. शिवाय जर कोणाची हरकत नसेल तर सर्वांनी मिळून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. मला त्याबाबत काही अडचण नाही, असे वक्तव्य करत आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यास तयार असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत.
मविआच्या बैठकीत काय ठरणार? – महाविकास आघाडीची स्थापना ही कोण्या एका व्यक्तीसाठी झाली नसल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यात असलेल्या महायुतीला सत्तेतून फेकून देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे. आगामी निवडणुकीत महायुतीची सत्ता आम्ही उलथवून लावू असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवाय आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे अनेक चेहरे आहेत. त्यामुळे आम्ही सर्व एकत्र बसून कोण मुख्यमंत्री असेल ते सत्ता आल्यानंतर ठरवू असेही ते म्हणाले.
पक्ष सोडलेले आमदार संपर्कात – शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंबरोबर जवळपास ४० आमदार गेले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यातल्या अनेक आमदारांमध्ये चलबिचल आहे. अशात त्या आमदारांना पुन्हा शिवसेना ठाकरे गटात घेणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर सर्वांनाच चक्रावून टाकणारे उत्तर उद्धव यांनी दिले. त्या गटात राहून जर ते मला मदत करणार असतील तर काय हरकत आहे? आम्ही त्यांना सध्या तपासून पाहात आहोत असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातील काही आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत. शिवाय ते खबरीचे काम करत असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले आहे. त्यामुळे शिंदेंचे टेन्शन मात्र वाढणार आहे.
सांगलीचा वाद मिटला? – सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे हे विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर नाराज होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवरही ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते दोघेही भेटले. विशाल, विश्वजित आणि चंद्रहार हे तरूण नेते आहेत. त्या निवडणुकीत काही तरी चुकीचे झाले आहे. पण आम्ही भाजपला तिथे हरवले हे महत्वाचे आहे. असे काही चुकीचे विधानसभा निवडणुकीत होणार नाही अशी ग्वाही आता त्या दोन्ही नेत्यांनी दिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.