राज्यभर सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या बेमुदत संपावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले आहे. या सुरु असलेल्या संपामुळे अनेक प्रकारे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. सामान्य जनतेचे दळणवळणाचे साधनच थांबल्याने अनेक कामे मागील ३ दिवसापासून रखडली आहेत.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना व विरोधकांवर देखील त्यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेऊ नका, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.
त्याचप्रमाणे संपकरी आंदोलकांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाही आहात. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी कशाप्रकारे पाऊले उचलत आहेत ते सुद्धा स्पष्ट करून सांगितले असून, न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे.
न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे. तसेच, अशा परिस्थितीमध्ये मी आपणास हात जोडून विनंती करत आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाच्या लढाइत पोळून निघाले आहेत.
दोन वर्षांपासून सुरु असलेल्या आणि अचानक उद्धभवलेल्या या महामारीचा मुकाबला करत आपण कसेतरी त्यातून मार्ग काढून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कृपया तुम्ही शासन तुमच्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, अशी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो आहे.” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.