खेड शहरात आधुनिक व सुरक्षित वीजपुरवठधाचे स्वप्न दाखवत सन २०१७ मध्ये भारत सरकारच्या इंटिग्रेटेड पॉवर डेवलपमेंट स्कीम (आयपीडीएस) अंतर्गत वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रकल्पास सुरुवात झाली. आठ वर्षांपूर्वी २५ कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प एका वर्षांत पूर्ण करायचा होता. मात्र महावितरणकडून ‘काम पूर्ण’ झाल्याचे अहवाल देण्यात आले असल्याचे समजते. मात्र शहरातील प्रत्यक्ष स्थिती पाहता हा प्रकल्प केवळ कागदोपत्रीच पूर्ण असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. खेड शहराची वाढती व्याप्ती, उंच इमारतींची वाढ, तसेच वारंवार उद्भवणारी पूरपरिस्थिती यामुळे भूमिगत वीजयंत्रणेची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाळ्यात होणारा वीजपुरवठा खंडित होणारा त्रास कमी करण्यासाठी भूमिगत केबल्स हा विश्वसनीय पर्याय मानला जातो. परंतु खेडमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्याचा दावा किती खरा आहे, यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
निविदेतील नियमानुसार साडेचार फूट खोल खड्डा करून एचटी व एलटी केबल बसवणे बंधनकारक होते. मात्र खेडमध्ये अनेक ठिकाणी केबल्स अगदी वरचेवर टाकून माती टाकल्याचे दिसून आले. काही भागात तर खोदकामाचे चिन्हही नाही. स्थानिकांच्या मते अनेक रस्त्यांवर भूमिगत केबल टाकलेल्याच नाहीत, यामुळे महावितरणच्या ‘पूर्णत्वाचा’ दावा संशयास्पद ठरतो. शहराच्या प्रमुख रस्त्यांपासून ते रहिवासी भागात सर्वत्र बसवलेले फिडर पिलर बॉक्स सध्या बंद अवस्थेत दिसतात. अनेक बॉक्स पूर्णपणे गंजलेले असून, काही ठिकाणी ते उघडे पडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही बॉक्स तर अर्धवट स्थितीत, ठिकठिकाणी तुटक्या अवस्थेत पडलेले दिसतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बॉक्स वीजपुरवठा यंत्रणेशी जोडलेच गेले नसल्याचे समोर आले आहे.
अंतर्गत खेडमध्ये तब्बल ३० किलोमीटर भूमिगत केबल जाळे उभे करणे अपेक्षित होते. कोट्यवधी रुपयांचा निधी वापरल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी आजही तारे उघड्यावरच लोंबत आहेत. ज्या भागात केबल्स टाकल्याचा दावा केला गेला, त्या भागातही प्रणाली कार्यान्वित नाही. म हावितरणचे मौन आणि चौकशीचे गूढया संपूर्ण प्रकरणाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याने माहिती देऊ शकत नाही, असा प्रतिसाद मिळाला. आठ वर्षांपासून प्रकल्प रखडल्याचा आणि नियमबाह्य काम झाल्याचा आरोप होत असतानाही अधिकृत माहिती लपवली जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

