मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे; परंतु गेली दोन वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे निवळी कोकजेवठार येथील स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अंडरपासचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावरचे पाणी गावात शिरत आहे. गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन अंडरपासचे काम पूर्ण होईपर्यंत उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान पावसाचे पाणी नदीप्रवाहात योग्यप्रकारे जोडण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. याचा परिणाम म्हणून पावसाळ्यात महामार्गावरून येणारे पाणी थेट गावातील मुख्य रस्त्यावरून वाहत घरांमध्ये आणि नारळ-सुपारीच्या बागांमध्ये शिरत आहे.
यामुळे अनेकांच्या घरांना धोका निर्माण झाला असून, शेतीतही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीही या खराब रस्त्यांमुळे अडथळे निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत आणि समस्यांचे गांभीर्य दाखवण्यात आणले आहे; मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होते. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. अंडरपासचे काम पूर्ण होण्यापूर्वी ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.