रत्नागिरीमध्ये कोरोनाची मागील काही महिन्यातील स्थिती खूपच भयावह होती. दिवसेंदिवस वाढणारा संसर्ग, होणारे मृत्यू त्यामुळे या आजाराबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीच निर्माण झाली आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर इतर सदस्यांना पण लागण होण्याची शक्यता असते, त्यामुळे या दुसर्या लाटेमध्ये कुटुंबच्या कुटुंब रुग्णालयात दाखल झालेली निदर्शनास आली. त्यामुळे लहानांपासून ते वयोवृद्ध एकमेकांची काळजी घेणार तर कशी !
कोरोनाच्या या लाटेमध्ये अनेकांनी आपल्या घरातील जवळचे सदस्य गमवले तर काही जणांचे पती रुग्णालयात तर काही जणांच्या पत्नी. कालच्या वटपौर्णिमेच्या दिवशी रत्नागिरीमध्ये एक आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. रत्नागिरीतील सामाजिक न्याय भवन कुवारबाव येथील कोविड सेंटर मध्ये हि वटपौर्णिमा साजरी केली गेली. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी साथ लाभावी यासाठी, स्वतःचा आजार विसरून या कोविड सेंटर मधील महिलांनी वडाची पुजा केली.
पण हा उपक्रम राबविण्यामागे कोविड सेंटर मधील महिलांना देखील हे व्रत करता यावे हाच एक उद्देश. यासाठी उपक्रमासाठी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या २००० सालच्या बॅचचे काही विद्यार्थी गणेश धुरी, प्रशांत सागवेकर, संदेश कांबळे, योगिनी सावंत, समीर भोसले, निता शिवगण, आणि सहकारी विद्यार्थी, हेल्पींग हँड संस्था आणि कोविड केअर सेंटर्स मधील सर्व कर्मचारी वर्ग यांचे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे या उपक्रमाच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी मिश्रा, जि.प.च्या सीईओ डॉ.जाखड , डॉ. फुले आणि कोविड सेंटर मधील सर्व आरोग्य यंत्रणेचे विशेष सहकार्य मिळाले. हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी यांनी विशेष मेहनत घेऊन महिलांसाठी दुपारी आणि रात्रीचे विशेष उपवासाच्या जेवणाची व्यवस्था केली. अशी आगळी वेगळी वटपौर्णिमा साजरी करायला मिळाल्याबद्दल महिलाही खूप आनंदी झाल्या.