मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी आता आंदोलनाचा नवा आणि निर्णायक टप्पा जाहीर केला आहे. दादर येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या महत्त्वपूर्ण सभेत कोकणातील ३५ विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत, रस्ता नाही, तर उत्सव महामार्गावरच ! या घोषणेसह संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता प्रत्येक तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरच १० दिवस सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. या अभिनव आंदोलनाचा कळस अनंत चतुर्दशीला पाहायला मिळणार आहे, जेव्हा कोकणवासीय मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विसर्जन मिरवणूक काढणार आहेत.
हा निर्णय केवळ प्रशासनाच्या बेपर्वाईविरोधातील लढ़ा नसून, कोकणी जनतेचे प्राण वाचवण्यासाठी देवाला घातलेली आर्त विनवणी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वालम यांनी या लढ्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. हे केवळ आंदोलन नाही, तर हक्काच्या रस्त्यासाठीचे देवाकडे मागणे आहे, असे ते म्हणाले. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, युवा कार्यकर्ते आणि नागरिक समाजाकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे. कोकणकरांनी आता सर्व संघटना आणि पक्षीय नेत्यांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.