कोकण रेल्वेला सर्वच हंगामामध्ये तुफानी गर्दी असते. अनेक वेळा दरवाज्यावर सुद्धा उभे राहून, दारामध्ये बसून अनेक प्रवासी तासनतास प्रवास करत असतात. पण अशा परिस्थितीमध्ये अनेकदा दुर्घटना घडतात. त्याचप्रमाणे, रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याच्या देखील अनेक घटना ताज्या आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर पडून जीवावर बेतण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. चुकीच्या पध्दतीने दारात उभे राहणे, दारात बसून प्रवास करणे असे प्रकार वारंवार होत असतात. असा निष्काळजीपणा थेट जीवावर बेतू शकतो याचं भान रेल्वे प्रवास करताना बाळगणे अत्यावश्यक आहे. यासाठी प्रशासन देखील वेळोवेळी सूचना देत असते.
कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या आंजणारी बोगद्यानजिक शनिवारी रेल्वेतून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. मात्र या अज्ञात तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही. लांजा तालुक्यातील आंजणारी येथे कोकण रेल्वे मार्गावर, आंजणारी बोगद्यानजीक रूपाच्या बाजूला तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर आंजणारी पोलिस पाटील श्रध्दा सरपोतदार यांनी लांजा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
हा प्रवासी नेमका कोणत्या गाडीतून पडला याबाबतही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या या प्रवाशाच्या डोक्याला, तोंडाला, हातापायाला गंभीर दुखापती झाली. याच कारणामुळे त्याचा मृत्यू ओढावला असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सदर व्यक्तीला कोण ओळखत असेल तर, त्यांनी लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेची लांजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. जी. चावरे हे करत आहेत.