एसटी संपातून अनेक कर्मचार्यांनी माघार घेतली असून, रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक बस फेर्या सुरु करण्यात आल्या आहेत. शासनाने वेतनवाढ करून सुद्धा आवाहन करुनही एसटी कर्मचार्यांनी संप अजून सुरु ठेवलेला नाही, मात्र काही ठिकाणी एसटी कर्मचारी हजर झाल्याने एसटी गाड्या सुरू करण्याचा प्रशासनाने प्रयत्न सुरु केला आहे.
काल दापोली आगाराची बस खेड दापोली मार्गावर धावत असताना नवानगर येथे आली असता, शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने डाव्या बाजूकडून गाडीवर दगड मारल्याने बसच्या दर्शनी भागाची काच फुटली आहे. त्यावेळी गाडीमध्ये आठ प्रवासी होते. परंतु या घटनेमध्ये चालक, वाहक किंवा प्रवासी यांपैकी कोणालाही दुखापत पोहोचली नाही. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली प्रमाणे, लांजा बसस्थानकामध्ये सुद्धा उभ्या असलेल्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगड मारून ड्रायव्हर साईडची काच फोडल्याची घटना रविवारी घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्यानंतर शनिवारी २७ नोव्हेंबर पासून लांजा एसटी आगारातून तालुक्याचा काही ग्रामीण भागावर एसटी फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. रविवारी देखील दहा फेऱ्या सोडण्यात आल्या. लांजा बस स्थानकातून रविवारी सकाळी दहा वाजता लांजा पाली बस सोडण्यात आलेली, त्यानंतर ही बस दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी लांजा बसस्थानकात परतल्यावर उभी करण्यात आली होती. ही बस उभी असतानाच अज्ञात व्यक्तीने गाडीच्या ड्रायव्हर साईडला असलेल्या काचेवर दगड मारून ती काच फोडली. सायंकाळी चार नंतर ही बाब एसटी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली अज्ञात व्यक्तीने दगड मारून ही काच फोडल्याने लांजा एसटी आगाराचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.