रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील चर्चेत असलेले सावकारी व्याज धंद्याचे प्रकरणाबद्दल पोलिसांनी जनजागृती सत्र हाती घेतले आहे. रत्नागिरी शहरी भागापासून ते ग्रामीण भागामध्ये, त्याचप्रमाणे इतर तालुक्यांतील चिपळूण, गुहागर, सावर्डे, अलोरे, शिरगाव, खेड संगमेश्वर, जयगड, पूर्णगड, आणि दापोली पोलीस स्थानक हद्दीमध्ये संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून दिनांक १ जुलै २०२१ ते दिनांक १२ जुलै २०२१ या कालावधीत संबंधित विषयान्वये नागरिकांसाठी जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलीस स्थानकामध्ये मागील महिन्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण मधील खाजगी सावकारा विरूध्द कर्जाऊ रक्कमेच्या परतफेडीसाठी बेकायदेशीरपणे शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करून मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आलेला. सदर गुन्ह्याचा तपास चिपळूण पोलीसांमार्फत सध्या सुरू आहे. तसेच एका रिक्षा व्यावसायिकाने सावकाराच्या पिळवणुकीमुळे केलेल्या आत्महत्येमुळे अवैधरीत्या सुरु असलेल्या सावकारी व्याजी धंद्यांची प्रकरण समोर येऊ लागली. त्यामुळे खाजगी परवानाधारक किंवा विनापरवानाधारक सावकार गरजू व्यक्तीने त्यांच्याकडून कर्जाऊ घेतलेल्या रक्कमेच्या परतफेडीसाठी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून कर्जदार व्यक्तींच्या घरातील मौल्यवान वस्तू, वाहन यांच्यावर जप्ती आणून पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास आले.
सदर जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांना बेकायदेशीर व अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने लागू केलेल्या महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ कायद्यानुसार तरतुदींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक व फसवणूक होऊ नये या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्थानक प्रभारी अधिकाऱ्याना याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतच्या सूचना दिल्या.