तळकोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड करून शिवसेनेने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या आधी मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. तळकोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्या दुसऱ्या पुढीच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांची नियुक्ती केली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्यास मदत होणार आहे. तळकोकणात सध्याच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे.
येथे ठाकरे यांच्या शिवसेनेतून पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपमध्ये जाताना दिसत आहेत, तर ही गळती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवादाच्या अभावामुळे तर नेत्यांनी पक्षसंघटनेच्या बांधणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच होत असल्याचा सध्या आरोप होताना दिसत आहे. यामुळे जो पक्षाशी जोडला गेलेला कार्यकर्ता आहे तो कोणाच्या भरवशावर थांबायचे, असा सवाल करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर रत्नागिरी, जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या निवडीनंतर विक्रांत जाधव यांचे वडील भास्कर जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
राजकीय समीकरणे बदलणार? – एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यातील मातब्बर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत. शिवसेनेला सध्या चेहरे नसल्याची टीका होत आहे. अशावेळी विक्रांत जाधव यांची नियुक्ती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नव्या नेतृत्वामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे. विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल, असाही दावा पक्षाकडून केला जात आहे.

 
                                    