पावसाळी वेळापत्रकातील बदल आरक्षण प्रणालीत झालेले नसल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडालेला आहे. २२ ऑगस्टच्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु झाले असले तरी वंदे भारत एक्स्प्रेससह अन्य तीन गाड्यांचे १० जूनपासूनचे आरक्षण सुरू झालेले नाही. याबाबत प्रवासी आरक्षण प्रणालीवर (आयआरसीटीसी) प्रवाशांना दाखवण्यात येत असलेला संदेशही चुकीचा असून त्यावर ट्रेन रद्द, असा संदेश पाहायला मिळत आहे. त्यामुळे या गाड्या जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत का अशी शंका प्रवाशांमधून उपस्थित होत आहे. प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर प्रतिवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. या अंतर्गत सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. त्यामुळे प्रवास वेळेत होतो.
याचा सर्वात जास्त परिणाम अति जलद गाड्यांवर होऊन एका दिवसात मुंबईहून गोव्यात जाऊन परत येणाऱ्या गाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी होतात. तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून पाचऐवजी तीन तर वंदे भारत एक्स्प्रेस सहाऐवजी तीन दिवस धावते. भारतीय रेल्वेवर नियमित गाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरु होते. त्यामुळेच पावसाळी वेळापत्रकात होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे. परंतु तसे अद्यापतरी झालेले नसल्याची बाब पुढे आली आहे. २२ ऑगस्ट साठीचे आरक्षण सुरु झाले असले तरी अजूनही मुंबई-मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस यासारख्या प्रीमियम गाड्यांसोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या तीन गाड्यांचे आरक्षण १० जूनपासूनचे आरक्षण सुरु झालेले नाही.
याबाबत IRCTC वर (प्रवासी आरक्षण प्रणाली पीआरएसवर) प्रवाशांना दाखवण्यात येत असणारा संदेशही चुकीचा असून त्यावर ट्रेन कॅन्सल्ड असे नमूद केलेले आहे. त्यामुळे या गाड्या जूनपासून रद्द करण्यात आल्या आहेत का अशी शंका प्रवाशांना येत आहे. पुढील दहा दिवसांत कोकणात सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या सणाच्या दिवसांतले म्हणजेच गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोंकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची गरज आहे, असे प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.