शहरात हापूस आंबा विक्रीमध्ये परप्रांतीय विरुद्ध स्थानिक व्यापारी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. परप्रांतीय विक्रेते हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकत असल्यामुळे काही स्थानिक विक्रेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हापूस आंब्याला बदनाम करणाऱ्यांचा यापुढे बंदोबस्त करण्याचा इशारा विक्रेत्यांनी दिला आहे. चिपळूण आणि गुहागरमधील हापूस आंबा अजून म्हणावा तसा बाजारात आलेला नाही. येथील विक्रेते रत्नागिरीतून आंबा आणून विकत आहेत. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला स्थानिक बाजार पेठेत तसेच बाहेरगावी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
चिपळूणमधील आंबा विक्रेते मुंबई-पुण्यासह दुबईच्या मार्केटमध्ये आंबा विकत आहेत. चिपळूण शहरातील गुहागरनाका हे हापूस आंबा विक्रीचे केंद्र बनले आहे. येथे परिसरातील महिला आंबा विक्री करतात. त्याशिवाय घाऊकमध्ये आंबा खरेदी करून किरकोळमध्ये आंबा विक्री करणारे व्यापारीही कार्यरत आहेत. ते चार हजार रुपये शेकडा दराने हापूस आंबा विक्री करत आहेत. मात्र, काहीजण हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा अडीच ते दोन हजार रुपये शेकडा दराने विकत आहेत. कर्नाटकचा आंबा विकणाऱ्यांमध्ये परप्रांतीय विक्रेते अधिक आहेत. त्यामुळे जे रत्नागिरीतून हापूस आंबा आणून विक्री करतात त्यांचा आंबा ग्राहक घेत नाहीत.
गुढीपाडव्यानंतर हापूस आंब्याच्या मागणीत वाढ होते. दरही कमी होतात. यावर्षी हापूस आंब्याचा हंगाम चांगला आहे आणि दरही चांगला मिळत आहे; मात्र कर्नाटकचा आंबा काही विक्रेते हापूस आंब्याच्या नावाखाली विकत असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे. गुहागरनाका येथे हापूस आंबा विकणाऱ्या विक्रेत्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विक्रेते फैयाज भाटकर यांनी हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकणाऱ्यांना कायदेशीर अद्दल घडवण्याचा इशारा दिला आहे.
कोकणातील हापूसची वैशिष्ट्ये – हापूस कापल्यावर केशरी दिसतो पिवळेपणाची झाक त्यावर नसते. कर्नाटकातील आंब्यांचा सुगंध हापूसइतका गोड येत नाही. हापूस आंबा तयार झाल्यावर त्याच्यावर सुरकुत्या पडतात. कर्नाटक आंबा तयार झाल्यावर कडकच असतो. कर्नाटकी आंब्याची सालही जाड असते. हापूस आंब्याची साल पातळ असते. देवगडची अधिक पातळ असते. कोकणातील हापूस आंब्याची पेटी अठरा ते वीस इंच इतकी असते. कर्नाटक आंबापेटी मात्र त्यापेक्षा लहान असून, ती चौदा ते पंधरा इंचाची होती.