कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेचा प्रवास नेहमीच उशिराने सुरू आहे. वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे वेळेत पाहोचावी यासाठी या दोन्ही रेल्वे उशिराने सोडल्या जातात. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेने तेजस, जनशताब्दीची वाट अडविल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर मध्यमवर्गीयांना परवडत नाही. मध्यमवर्गीय लोक जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. मात्र मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना उशिराने धावणाऱ्या रेल्वेचा त्रास सहन करावा लागत आहे.
एकाच दिशेने केवळ पंचवीस मिनिटाच्या फरकाने धावणाऱ्या य रेल्वे कोकण रेल्वे महामंडळाला चालवायच्या आहेत की नाही असा प्रश्न संतप्त प्रवासी करीत आहेत. जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या मुंबई ते मडगाव यादरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या प्रीमियम एक्स्प्रेस रेल्वे आहेत. या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भाडे देखील जास्त घेतले जाते.
रत्नागिरी ते पनवेलपर्यंत जाण्यासाठी सुमारे सहाशे ते बाराशे दरम्यान तिकीट दर आकारले जाते. प्रवासी जास्त पैसे देत असल्यामुळे या गाड्या वेळेत पोहचणे गरजेचे असते. मात्र अलिकडे या दोन्ही गाड्या कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त तीन तास उशिराने धावत आहेत. तेजस ही रेल्वे अनेकवेळा चार तास उशिराने धावते. त्यामुळे या एक्स्प्रेस रेल्वेतून प्रवास करण्यासाठी जादा पैसे का द्यावे असा प्रश्न आता कोकणातील प्रवासी विचारत आहेत.